बार्शी, प्रतिनिधी
बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका 25 वर्षीय आईने आपल्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याला विष पाजल्यानंतर स्वतः साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे (वय 25) असे असून, तिचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे (वय 14 महिने) हा सध्या गंभीर अवस्थेत उपचाराधीन आहे. त्याला बार्शीतील खासगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.
ही दुर्दैवी घटना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघड झाली. घरकामासाठी आलेल्या कामगार महिलेला घरात कोणीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने खिडकीतून आत पाहिले असता, अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, तर चिमुकला शेजारीच बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. घाबरलेल्या महिलेने तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना खबर दिली. काही मिनिटांतच परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
चार वर्षांपूर्वी झाले होते लग्न
अंकिताचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता ही आपल्या लहान मुलासह घरात एकटीच होती.
कारण अद्याप अस्पष्ट
या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक वाद होता का, याचा तपास सुरू आहे. जवळच्यांना तिच्या वर्तनात अलीकडे काही बदल जाणवला होता का, हेही तपासात समोर येईल.
“आईने निरागस बाळालाही यात ओढलं”
एका आईने आपल्या लेकरालाच या दुर्दैवी निर्णयात ओढल्याने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. बार्शीतील नागरिकांमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आत्महत्येचं कारण उलगडण्यासाठी पती व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.


