मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे मार्गावर शनिवारी सायंकाळी घडलेली एक घटना अक्षरशः थरारक ठरली. माटुंगा पुलावरून जात असलेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये अचानक धुराचे लोट पसरले आणि काही क्षणांतच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानामुळे 28 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
मिनिटा-मिनिटाचा थरार
शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दादरहून पुण्याकडे निघालेली शिवशाही बस माटुंगा पुलावर पोहोचली होती. त्याचवेळी बसच्या मागील भागातील एसी डक्टमधून अचानक धूर निघू लागला. काही प्रवाशांना जळका वास जाणवू लागला आणि काहींनी बसमध्ये आग लागल्याची शंका व्यक्त केली. काही क्षणांतच बसच्या आत धुराचे साम्राज्य पसरले.
प्रवाशांनी चालकाचे लक्ष वेधले. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. परिस्थिती गंभीर होत चालल्याचे पाहून त्याने आपत्कालीन दरवाज्याची काच फोडली आणि प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली.
प्रवासी सुखरूप, चालकाचे कौतुक
या संपूर्ण घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही. बस चालकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. काहीजण मुख्य दरवाजातून बाहेर पडले, तर दोन-तीन प्रवासी आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले. नंतर या सर्व प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसमधून पुण्याकडे रवाना करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत एसी फ्युज सर्किटमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सुरु आहे.
शिवशाही, प्रवासाचा लक्झरी पर्याय की धोक्याची घंटा?
एसटी महामंडळाची शिवशाही बस सेवा प्रवाशांना अधिक आरामदायक आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय म्हणून सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या काही वर्षांत या बस सेवेवरील अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे.
२०१७ ते २०१९ या कालावधीत ‘शिवशाही’च्या तब्बल १,०७५ अपघातांची नोंद झाली. या अपघातांत ५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तर ३६७ प्रवासी जखमी झाल्याचे अधिकृत आकडेवारीत नमूद आहे. केवळ ठाणे विभागात २०१८ मध्येच २६ अपघात घडले होते. यापैकी बहुतांश घटना तांत्रिक दोष, ब्रेक निकामी होणे, किंवा एसी युनिटमधून धूर येणे अशा कारणांमुळे घडल्या.
नोव्हेंबर २०२४ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे झालेल्या भीषण शिवशाही अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना अजूनही अनेकांच्या स्मरणात ताजी आहे.
एसटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अशा घटनांमुळे एसटीच्या लक्झरी बस सेवेच्या देखभालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना, तांत्रिक दोषांकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्घटना भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
चालकाचा हिरो ठरलेला क्षण
या घटनेत चालकाने दाखवलेली तत्परता शिवशाहीच्या या भीषण प्रसंगात आशेचा किरण ठरली. धुराच्या लोटांनी भरलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवणारा हा चालक आता प्रवाशांच्या डोळ्यात खरा हिरो ठरला आहे.
“शिवशाही” म्हणजे फक्त नावापुरती लक्झरी नव्हे, तर ती प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षिततेची शाही सेवा ठरावी, अशी आता वेळ आली आहे. तांत्रिक त्रुटींवर फक्त चौकश्या नव्हे तर ठोस कारवाई आणि देखभालीचे नियोजन झाल्याशिवाय या बस सेवेवरील विश्वास पुनर्स्थापित होणार नाही.


