मुंबई प्रतिनिधी
वांद्रे (पूर्व) येथील ‘मातोश्री’ या ठाकरे घराण्याच्या निवासस्थानावर अचानक फिरकलेल्या ड्रोनच्या प्रकरणाने मुंबईत राजकीय खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे.
अनिल परब, सचिन अहिर आदी नेत्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केल्यानंतर आता माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट सोशल मीडियावरून प्रशासनालाच पाच प्रश्न विचारत परिस्थिती अधिक धगधगती केली आहे.
🚨 A drone was caught peeping into our residence this morning and when the media learnt about it, the @MMRDAOfficial is saying it was a survey being done for BKC with permission of the Mumbai Police.
Okay.
⚠️ What survey allows you to peep inside homes and fly out quickly when…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 9, 2025
“हा सर्वे की नजर?” आदित्य ठाकरेंचा सवाल”
“आज सकाळी आमच्या निवासस्थानात डोकावणारा एक ड्रोन पकडला गेला. माध्यमांना याची माहिती मिळताच @MMRDAOfficialने सांगितले की हा बीकेसीसाठी करण्यात येणारा सर्वे आहे आणि पोलिसांची परवानगी घेऊनच करण्यात आला आहे. ठीक आहे. पण मग काही प्रश्न अनुत्तरित राहतात,” असे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या एक्स (X) अकाऊंटवर नमूद केले आहे.
यानंतर त्यांनी सलग प्रश्नांची मालिका झोडत संशयाची दिशा स्पष्ट केली.
* आदित्य ठाकरेंचे पाच प्रश्न, सरकारला अडचणीत टाकणारे
1. कोणत्या सर्वेक्षणाला घरांच्या आत डोकावण्याची परवानगी असते?
सर्वेक्षणाच्या नावाखाली खासगी निवासस्थानाभोवती ड्रोन फिरवला जातो, हे नियमांच्या चौकटीत कसे बसते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
2. रहिवाशांना पूर्वसूचना का दिली नाही?
अधिकृत सर्वे असल्यास नागरिकांना याची पूर्वकल्पना देणे आवश्यक नाही का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
3. बीकेसीचा सर्वे की ‘मातोश्री’चा’?
बीकेसीच्या नावाखाली केवळ आमच्या घराच्या परिसरात ड्रोन का, असा संशय त्यांनी मांडला.
4. एमएमआरडीएने जमिनीवर उतरून पाहावे!
“एमएमआरडीएने ड्रोन उडवण्याऐवजी जमिनीवर उतरून भ्रष्टाचाराचे मूळ असलेल्या एमटीएचएल (अटल सेतू)सारख्या अपूर्ण कामांकडे लक्ष द्यावे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
5. पोलिसांनी परवानगी दिली असल्यास, रहिवाशांना माहिती का नाही?
पोलिस परवानगी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘मातोश्रीभोवती ‘ड्रोन’ची रहस्यमय वलयं
‘मातोश्री’ परिसरात शनिवारी सकाळी एका ड्रोनने काही मिनिटे घिरट्या घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा ड्रोन कोणाचा? नेमका हेतू काय? या प्रश्नांची उत्तरं अद्याप अस्पष्ट आहेत.
पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, तो बीकेसी विकास प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षणाचा भाग असल्याचा एमएमआरडीएचा दावा आहे. मात्र, ठाकरे गटाने हा दावा फेटाळून तपासाची मागणी केली आहे.
‘राजकीय वातावरणात ‘ड्रोन’च्या सावल्या’
राज्याच्या राजकारणात ठाकरे घराणं हे कायमच संवेदनशील केंद्र राहिलं आहे. त्यामुळे ‘मातोश्री’सारख्या उच्च सुरक्षा परिसरात असा ड्रोन फिरकणे ही बाब किरकोळ नाही, असे निरीक्षकांचे मत आहे.
विरोधी पक्षांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू होण्याची चिन्हं आहेत.
मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याचे सांगितले आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नांमुळे आता या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘मातोश्री’च्या आकाशात फिरलेला हा ड्रोन नेमका माहिती गोळा करत होता की राजकीय तापमान मोजत होता. हे लवकरच स्पष्ट होईल.
हवेतील ‘ड्रोन’ आता केवळ सर्वेक्षणाचे साधन राहिलेले नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर संशयाचे नवीन वलय निर्माण करणारे प्रतीक ठरत आहेत.


