नागपूर प्रतिनिधी
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे रामटेक पोलिसांनी शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव राजू हटवार आणि अध्यक्ष भीमराव गोंडणे यांना ताब्यात घेतल्याने राज्यातील शेतकरी संघटनांत संतापाची लाट उसळली आहे. चर्चेचा प्रस्ताव देताच कार्यकर्त्यांना अटक करून सरकार दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत.
शेतकरी नेते अजित नवले यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत सरकारवर लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप केला. “एकीकडे संवादाचे आमंत्रण, तर दुसरीकडे रात्री अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न. ही कोणती लोकशाही?” असा सवाल त्यांनी केला.
पोलिसांनी मात्र ही कारवाई कायदेशीर कारणास्तव झाल्याचे सांगत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. तथापि, पुढील काही तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी अटकेत घेतलेल्या नेत्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली असून “संवादाचाच मार्ग योग्य, दडपशाहीने प्रश्न सुटणार नाहीत” असे मत व्यक्त केले आहे.
मुंबईत मुख्यमंत्री–शेतकरी नेते बैठक
नागपूर-वर्धा मार्गावर ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेसाठी मुंबई गाठण्यास सहमती दर्शवली.
महामार्गावरील आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत मैदानात स्थलांतर केले. अधूनमधून पडणाऱ्या पावसातही शेतकरी ठामपणे ठिकाणीच राहिले. “पावसातही आंदोलन सुरूच राहील” असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत होणाऱ्या कर्जमाफीसह शेतकरी प्रश्नांवरील बैठकीस हजर राहणार आहेत. बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
नागपूरात रेल्वेरोको; वाहतूक विस्कळीत
दरम्यान, बच्चू कडू यांच्या समर्थकांनी नागपूरात रेल्वे ट्रॅकवर उतरून जोरदार घोषणाबाजी करत रेल्वेरोको आंदोलन सुरू केले. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
समर्थकांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा, वृद्धांना नियमित अनुदान आणि शिक्षण-आरोग्य सुधारणा अशा २२ मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले आहे. “मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन उग्र रूप धारण करेल” असा इशारा कडू यांनी दिला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
सरकारने शेतकऱ्यांसोबत संवाद साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळते. मात्र नेत्यांच्या अटकेनंतर आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.


