सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १५,६३१ पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
या भरतीत सोलापूर ग्रामीणमधील ९०, सोलापूर शहरातील ९६, तर राज्य राखीव पोलिस बल आणि कारागृह शिपाई यांची एकत्रित सुमारे ५५ पदे उपलब्ध आहेत.
राज्यातील पोलिस विभागातील ही मोठी भरती गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होती. राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात या भरतीला मान्यता दिली होती. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता लक्षात घेऊन अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर राज्याच्या गृह विभागाने आता औपचारिक वेळापत्रक जाहीर केले आहे.
* अर्ज प्रक्रिया आणि अटी
उमेदवारांना फक्त एका पदासाठी आणि एका जिल्ह्यातच एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज केल्यास उमेदवारांचे सर्व अर्ज बाद ठरतील.
मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असून, त्यानंतर प्रत्येक पदासाठी उत्तीर्ण उमेदवारांपैकी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाईल. लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे.
राज्यातील रिक्त पदांचे तपशील
* पोलिस शिपाई – १२,३९९
* चालक शिपाई – २३४
* सशस्त्र पोलिस शिपाई – २,३९३
* कारागृह शिपाई – ५८०
* बॅण्डसमन – २५
एकूण – १५,६३१ पदे
* ऑनलाइन अर्जाची माहिती
उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी: ₹४५०
मागास प्रवर्गासाठी: ₹३५०
राज्यातील तरुणांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे. पोलिस दलातील सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे.


