सोलापूर प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सोलापुरात भाजपने एक मोठा राजकीय धक्का देत ‘ऑपरेशन लोटस’ अधिकृतपणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेसला मोठे खिंडार पाडणारा हा घटनाक्रम मानला जात आहे.
येत्या २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील चार बड्या माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे भाजपची जिल्ह्यातील ताकद लक्षणीय वाढणार असून, विरोधी पक्षांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
‘माढ्यातील राजकारणात भूकंप’
माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र आणि जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटात कार्यरत असलेले शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांच्याकडून पराभव पत्करला होता. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, माढा मतदारसंघात हा निर्णय ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
‘एकाच दिवशी चार माजी आमदारांचा प्रवेश’
रणजित शिंदे यांच्यासोबत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हेही भाजपच्या झेंड्याखाली दाखल होणार आहेत.
एका दिवसात चार माजी आमदारांचा प्रवेश म्हणजे भाजपसाठी मोठी राजकीय वाढ मानली जात आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला स्वबळावर लढण्यासाठी यामुळे बळ मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘स्थानिक विरोधावर मात’
माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी सुरुवातीला विरोध दर्शवला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाने या विरोधावर तोडगा काढत चर्चा केली आणि अखेर प्रवेशाची तारीख निश्चित केली.
भाजप नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर आगामी काळात मोठे आव्हान उभे राहणार आहे.
भाजपच्या या राजकीय मास्टरस्ट्रोकने सोलापुरातील आगामी निवडणुकांचे समीकरणच बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


