नंदुरबार प्रतिनिधी
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुन्हा एकदा “ऑपरेशन लोटस”ला वेग मिळाल्याचे चित्र आहे. बंडखोर आणि नाराज नेत्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याची मोहिम सुरू असताना आता नंदुरबार जिल्ह्यातही भाजपची ताकद वाढणार आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देत अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. “पक्षाला अडचण येऊ नये म्हणून मी राजीनामा दिला. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले,” असं त्या वेळी त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
भाजपची दारे पुन्हा खुली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच भाजपने हिना गावित यांच्यासाठी पुन्हा दारे खुली केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डॉ. गावित आज पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असून, या प्रवेशामुळे जिल्ह्यातील संघटनात्मक समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजप नेत्यांच्या मते, “डॉ. गावित यांच्या पुनरागमनामुळे नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात पक्षाचे बळ अधिक वाढेल.”
गावित घराण्याचे राजकीय वजन
डॉ. हिना गावित या माजी आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. गावित घराण्याचा आदिवासी पट्ट्यात दीर्घकाळापासून प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा पराभवानंतर नवा अध्याय
2024 च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा तब्बल 1,59,120 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवून पुन्हा राजकीय पायाभरणी सुरू ठेवली.
आता भाजपमध्ये परत प्रवेश करून हिना गावित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू केला आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


