पुणे, प्रतिनिधी
पुण्यातील गजानन मारणे टोळीचा सक्रिय सदस्य आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा रूपेश मारणे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. कोथरूड पोलिसांनी आज पहाटे मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका आलिशान बंगल्यावर धाड टाकून त्याला अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून तो फरार होता.
रूपेश मारणे याच्यावर खंडणी, मारहाण, खुनाचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गजानन मारणे टोळीतील महत्त्वाचा सदस्य असून, टोळीप्रमुखाशी त्याचे थेट संपर्क होते.
फरारी असतानाही तो टोळीच्या विविध बेकायदेशीर व्यवहारांचे नियोजन आणि अंमलबजावणी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कोथरूड हल्ला प्रकरणाशी संबंध
कोथरूडमधील आयटी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गजानन मारणे टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चित्रपट पाहून परतत असताना वाहतूक कोंडीवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. या प्रकरणात गजानन मारणे याच्यासह काहींना पोलिसांनी अटक केली होती, तर रूपेश मारणे मात्र त्यानंतर पसार झाला होता.
पहाटेचा सर्च ऑपरेशन
कोथरूड पोलिसांकडे रूपेश मारणे मुळशीतील आंदगाव येथील एका बंगल्यात लपल्याची माहिती आली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पोलिसांनी परिसराला वेढा घातला. सर्व बाहेरचे रस्ते बंद करण्यात आले. दरवाजा ठोठावल्यावर एका महिलेने दार उघडले आणि त्याच क्षणी पोलिसांनी आत घुसून रूपेश मारणे याला ताब्यात घेतले.
‘मुळशी कनेक्शन’ पुन्हा एकदा
रूपेश मारणे हा यापूर्वीही मुळशी परिसरातच लपल्याचे समोर आले होते. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिकाच्या अपहरण व चार कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्याच्यावर मकोकांतर्गत कारवाई झाली होती. त्या वेळीही तो बराच काळ फरार राहून मुळशीतूनच पकडला गेला होता. या वेळेसदेखील त्याचा शेवटचा ठावाच मुळशीत लागला.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, “रूपेश मारणे हा टोळीतील आर्थिक हालचाली आणि खंडणी व्यवहारांचे नियोजन करीत होता. त्याच्या अटकेमुळे गजानन मारणे टोळीच्या हालचालींवर आळा बसण्याची शक्यता आहे.”
अटक झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू असून, आणखी काही गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


