माढा प्रतिनिधी
कुर्डुवाडी येथे मोबाईल गेममुळे शेतकऱ्याचे लाखो रुपये वाऱ्यावर गेल्याची घटना ताजी असतानाच, बार्शी तालुक्यातील एका तरुणाने चक्री गेमच्या व्यसनातून कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कुसळंब (ता. बार्शी) येथील समाधान तुकाराम ननवरे (वय ३२) या तरुणाने शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्रीनंतर राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईलवरील गेम्समुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
समाधान ननवरे गेल्या सात वर्षांपासून बार्शी शहरातील शिवाजीनगर परिसरात ‘डायमंड सलून’ हे दुकान चालवत होता. मेहनतीच्या बळावर त्याने व्यवसायात चांगली प्रगती साधली होती. वरिष्ठ अधिकारी, व्यापारी, विद्यार्थी यांचा त्याच्याशी चांगला संपर्क होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो मोबाईलवरील ‘चक्री गेम’च्या आहारी गेला होता.
सुरुवातीला छोट्या रकमेवर खेळ सुरू झाला; परंतु हळूहळू हा जुगारच बनला. कधी एक लाख रुपये जिंकायचा, तर काही वेळा दोन लाखांचा तोटा सहन करायचा. मित्रांकडून, पतसंस्था आणि बँकांकडून घेतलेले पैसे या व्यसनात उडवले. काही खासगी सावकारांचेही पैसे बाकी असल्याचे समजते. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडूनही कर्जाच्या स्वरूपात काही रक्कम त्याच्याकडे आली होती.
घटनेच्या दिवशी पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा भाऊबीजेनिमित्त माहेरी गेले होते. घरी आई आणि बहिणीसोबत रात्री जेवण करून तो आपल्या खोलीत झोपायला गेला. पहाटे आई सीताबाई ननवरे यांनी पाणी गरम करण्यासाठी उठल्यावर त्याने लोखंडी हुकाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर घरात एकच आक्रोश माजला.
“ग्रामीण भागातील मुलगा शहरात येऊन स्वतःचा व्यवसाय उभा करतो, कुटुंबाचा संसार फुलवतो, आणि अशा क्षुल्लक व्यसनामुळे सगळं संपवतो, हे अत्यंत वेदनादायी आहे,” अशी प्रतिक्रिया नातेवाईक सुधाकर शिंदे (मेव्हणे, स्टायलेश मेन्स पार्लर, बार्शी) यांनी दिली.
समाधान ननवरे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मागे पत्नी, लहान मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मोबाईल गेमच्या व्यसनामुळे वाढते आत्महत्यांचे प्रकार लक्षात घेता शासनाने तातडीने यावर नियंत्रण आणावे, या अॅप्समागील आर्थिक साखळी व जबाबदार व्यक्तींचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


