मुंबई प्रतिनिधी
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी. कोकण रेल्वे मार्गावरील दिवा–चिपळूण मेमू (MEMU) रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे चिपळूण तसेच आसपासच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करोनाकाळात बंद झालेली दादर–दिवा पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. त्यादरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टपासून तात्पुरती दिवा–चिपळूण मेमू रेल्वे सुरू करण्यात आली होती. दिवाळीपर्यंत चालवण्यात आलेल्या या गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने रेल्वे प्रशासनाने ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवा ते चिपळूण मेमू रेल्वे सकाळी ७.१५ वाजता दिवा स्थानकातून सुटेल, तर परतीची गाडी दुपारी १२ वाजता चिपळूणहून रवाना होईल. दोन्ही गाड्या सुमारे सहा ते सात तासांत गंतव्य स्थळी पोहोचतील. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
या मेमू गाडीला चिपळूण, खेड, रोहा, माणगाव, गोरेगाव, वीर, कोलाड, इंदापूर, पेण, पनवेल आदी २६ स्थानकांवर थांबे असतील. सध्या कोकणमार्गावर दररोज सुमारे २६ प्रवासी एक्सप्रेस गाड्या धावत असल्या, तरी अनेक गाड्यांना चिपळूण येथे थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. जनरल डब्यांतील गर्दीमुळे अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत होता.
दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांना थेट रेल्वे सुविधा नसल्याने या भागातील प्रवासी चिपळूणमार्गे प्रवास करतात. खेड, संगमेश्वर आणि सावर्डे परिसरातील प्रवाशांनाही या मेमू गाडीचा मोठा लाभ होणार आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे तब्बल २५ वर्षांनंतर चिपळूणसाठी स्वतंत्र रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.


