
नागपूर प्रतिनिधी
दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीने नागपूरकरांना चांगलाच धसका बसवला. गेल्या २४ तासांत शहरात तब्बल १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ झाली. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपासूनच सुरू झालेल्या या आगीच्या मालिकेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सर्वाधिक भीषण घटना लक्ष्मीनगरातील आठरस्ता चौकात असलेल्या रिलायन्स मार्ट किराणा दुकानात घडली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका रॉकेट फटाक्याने दुकानाच्या अंगणातील झाडावर पेट घेतला. त्या झाडावरून उडालेल्या ठिणग्यांनी रिलायन्स मार्टच्या प्लास्टिक बॅनरला आग लावली. काही क्षणातच वितळलेल्या प्लास्टिकचे तुकडे खाली पडलेल्या रिकाम्या कागदी डब्यांवर आणि पोत्यांवर पडल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.
केवळ दहा मिनिटांतच मार्टमधील प्लास्टिकचे साहित्य आणि धान्य पेटले. अग्निशामक विभागाने लोखंडी शटर कापून आत प्रवेश करत पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा मार्टमध्ये आठ कर्मचारी रोजच्या हिशेबाची नोंद घेत होते. ते आत अडकले असले तरी अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून सर्वांची सुरक्षित सुटका केली.
दरम्यान, बुधवारीही फटाक्यांमुळे आग लागण्याच्या दोन घटना नोंदल्या गेल्या. बहिरामजी टाउन येथील आयकॅड शिकवणी वर्गात फटाक्यांची ठिणगी पडल्याने पडदे आणि लाकडी साहित्य पेटले. त्याचप्रमाणे मानेवाडा परिसरातील अलंकार नगरात दुसरी आग लागली. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी लागलेल्या बहुतांश आगी सक्करदरा, सुगतनगर आणि कॉटन मार्केट परिमंडळात घडल्या. अग्निशमन दलाचे बंब वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली.