
नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तब्बल ९३७ पदांच्या भरतीसाठी मोठी जाहिरात काढली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क सेवांमधील ही भरती होणार असून, उमेदवारांना ६३ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वेतनाची संधी मिळणार आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेच्या निकालाच्या आधारे उमेदवारांना मुख्य परीक्षेची पात्रता मिळेल.
अर्ज प्रक्रिया ७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून पार पडेल. शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. आयोगाने अर्ज प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले असल्याने उमेदवारांनी कागदपत्रांची नीट पडताळणी करूनच अर्ज करावा, असे आवाहन एमपीएससीकडून करण्यात आले आहे.
परीक्षेचे स्वरूप
• पूर्व परीक्षा : १०० वस्तुनिष्ठ प्रश्न, १०० गुण
• मुख्य परीक्षा : प्रत्येक पदासाठी स्वतंत्र
• अभ्यासक्रम : सामान्य ज्ञान, विज्ञान, मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी
• मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
उपलब्ध पदे
• उद्योग निरीक्षक – ९
• तांत्रिक सहायक – ४
• कर सहायक – ७३
• लिपिक टंकलेखक – ८५२
एकूण : ९३७ पदे
इतक्या मोठ्या प्रमाणात भरती जाहिरात दिली गेल्याने राज्यातील हजारो तरुण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. एमपीएससीच्या इतिहासातील ही एक मोठी भरती मोहीम मानली जात आहे.