
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती, भाजप नाशिकरोड मंडळाचे माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी सोमवारी (दि. २०) ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. या प्रवेशामुळे नाशिकमध्ये 100 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगात आला असून, विविध पक्षांतून नेत्यांचे ‘इनकमिंग-आउटगोईंग’ सुरू आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत उबाठातून भाजप आणि शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र, आता नाशिकमध्ये या प्रवाहाला उलट दिशा मिळाली आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर यातील तब्बल २२ नगरसेवक शिंदे गटात, तर पाच नगरसेवक भाजपमध्ये गेले. जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनीही अनुक्रमे भाजप व शिंदे गटाची वाट धरली होती. त्यामुळे नाशिकमधील उबाठा गट खिळखिळा झाल्याचे चित्र होते. पण आता परिस्थिती बदलत असून, उबाठा पुन्हा उभारी घेताना दिसत आहे.
या प्रवेश सोहळ्यात भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले. भाजपच्या माजी नगरसेविकांसह शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत उबाठात प्रवेश केला. या वेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, माजी आमदार वसंत गिते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “आज नरक चतुर्दशी म्हणजे नरकासुराचा वध करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रावर भाजपच्या नरकासुराचे संकट आले आहे, ते आगामी निवडणुकीत संपवायचे आहे,” असा टोला ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “मी पुन्हा येईल” या वक्तव्याचीही ठाकरे यांनी खिल्ली उडवत, “मीदेखील पुन्हा नाशिकला येईल, पण भगवा फडकवूनच जाईन,” असे सांगताच कार्यकर्त्यांनी घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
या मान्यवरांनीही उबाठात प्रवेश
संगीता आणि हेमंत गायकवाड यांच्यासोबत गोखले एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रा. डॉ. लक्ष्मण शेंडगे, शिवांश फाउंडेशनचे संस्थापक विवेक बागूल (राजपूत), मराठी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षा रोहिणी उखाडे, प्रभाग २६ चे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, भाजप पदाधिकारी अंकुश व्हावल, समाजसेविका सीमा ललवाणी, बबिता मोरे, सुजाता गोजरे, सुजाता गवांदे, कांचन चव्हाण, जयकुमार ललवाणी, सत्यम खोले आणि हर्ष चव्हाणके यांनीही उबाठात प्रवेश केला.