
कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील शामगाव घाट परिसरात रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन संशयितांना देशी बनावटीच्या पिस्तुलांसह ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, अटक झालेल्यांपैकी एक हा कराडमधील एका नामांकित दारू व्यावसायिकाचा मुलगा असून या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे करवडी गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये कार्तिक अनिल चंदवानी (वय १९, रा. लाहोटीनगर, मलकापूर), ऋतेष धमेंद्र माने (वय २२, रा. कृष्णा अंगण, वाखाण रोड, कराड) आणि अक्षय प्रकाश सहजराव (वय २८, रा. लाहोटीनगर, मलकापूर) यांचा समावेश आहे.
संशयितांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून तीन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कराड तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा करत असून, संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारीविरोधात स्थानिक पातळीवर धडकी भरल्याचे चित्र आहे.