
चंदीगड
पंजाबमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या आलिशान भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत, सीबीआयने गुरुवारी मोठी कारवाई केली. रुपनगर (रोपड) रेंजचे उपमहानिरीक्षक (DIG) हरचरण भुल्लर यांना पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. मात्र ही कारवाई इतक्यावरच थांबली नाही, पुढील तपासात या अधिकाऱ्याच्या आलिशान जीवनशैलीचा आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा धक्कादायक उलगडा झाला आहे.
सीबीआयने हरचरण भुल्लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ५ कोटी रुपयांची रोकड, १.५ किलो सोनं, ऑडी व मर्सिडिजसह लक्झरी कारच्या चाव्या, तसेच अनेक फ्लॅट्स आणि जमिनींची कागदपत्रं जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून सापडलेल्या पैशांची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्राथमिक तपासानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सूचक इशारा दिला आहे की, संपत्तीचा आकडा आणखी वाढू शकतो.
‘८ लाखांच्या लाचेतून उलगडला कोट्यवधींचा खेळ’
सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, रुपनगर रेंजचे DIG हरचरण भुल्लर यांनी एका उद्योगपतीकडे ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. उद्योगपतीवर दाखल झालेला गुन्हा ‘सेटल’ करून देण्यासाठी आणि भविष्यात कारवाई न होण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती.
तक्रारदाराने सीबीआयकडे दिलेल्या माहितीच्या आधारे, एजन्सीने सापळा रचला. चंदीगडच्या सेक्टर २१ भागात DIG च्या जवळच्या व्यक्तीला ५ लाख रुपयांची पहिली हप्ता लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर सीबीआयने DIG ला कंट्रोल्ड कॉल करून पुरावे मिळवले. या संभाषणात DIG ने लाच स्वीकारल्याचं अप्रत्यक्षपणे कबूल करत, तक्रारदाराला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यानंतर सीबीआयने DIG हरचरण भुल्लर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
सीबीआयचा धडाकेबाज तपास
अटकेनंतर सीबीआयने DIG च्या अनेक ठिकाणांवर सलग छापेमारी केली. यामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या घरांमधून आणि मालमत्तांमधून कोट्यवधी रुपयांची रोकड, दागदागिने, सोन्याच्या विटा, किंमती घड्याळे, अनेक आलिशान कारांच्या चाव्या आणि मालकी हक्काचे दस्तऐवज मिळाले.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या रोकडीत फक्त नव्या नोटांचा समावेश आहे, तसेच काही नोटा अद्याप सीलबंद पॅकेटमध्ये सापडल्या.
भुल्लर यांच्याकडील सोन्याचा साठा आणि लक्झरी वस्तूंनी सीबीआयलाही चक्रावून सोडलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर या संपत्तीच्या मूळाचा शोध घेण्यासाठी आयकर विभाग आणि प्रवर्तन संचालनालयालाही (ED) तपासात सामील करण्याची तयारी आहे.
२००९ बॅचचा आयपीएस अधिकारी
हरचरण भुल्लर हे २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी पंजाब पोलिसांमध्ये विविध पदांवर सेवा बजावली आहे. अलीकडेच त्यांची नियुक्ती रुपनगर रेंजच्या DIG पदावर झाली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विरोधात ‘खंडणीसदृश मागण्या’ आणि नियमित महिन्याला पैसे घेण्याचे आरोप स्थानिक व्यावसायिकांकडून होत होते. या आरोपांनंतर सीबीआयला तक्रार मिळताच सापळा रचण्यात आला.
सध्या DIG हरचरण भुल्लर आणि त्याच्या साथीदाराची सीबीआय कोठडीत चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून सापडलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, अघोषित संपत्तीच्या गुन्ह्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवसांत सीबीआय या प्रकरणात आणखी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावू शकते.
‘८ लाखांची लाच’ घेणाऱ्या DIG च्या ताब्यातून ५ कोटींची रोकड, सोन्याचा साठा, लक्झरी कार आणि मालमत्तेचा डोंगर उघड झाला आहे. पंजाब पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या घटनेमुळे राज्य प्रशासनात खळबळ माजली असून, सीबीआयचा तपास आता सर्वांच्या नजरेत आहे.