सोलापूर प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांसाठी राज्य सरकारकडून दिलासा देणारी बातमी आहे. सोलापूर शहरातील रेशन दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना यंदा गव्हासोबत ज्वारी मोफत मिळणार आहे. बुलडाण्यावरून मोठ्या प्रमाणात आलेली ज्वारी आता अंत्योदय आणि प्राधान्यक्रमातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे.
अन्नधान्य विभागाच्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील तब्बल पाच लाख ३० हजार शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांसाठी गहूसोबत ज्वारीचे मोफत वाटप केले जाणार आहे. यामध्ये अंत्योदय कुटुंबांना दहा किलो गव्हाऐवजी पाच किलो गहू आणि पाच किलो ज्वारी, तर प्राधान्यक्रमातील कुटुंबांना दोन किलो गव्हाऐवजी एक किलो गहू व एक किलो ज्वारी दिली जाणार आहे.
• पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी दिलासा
सीना नदीच्या पुरामुळे बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विशेष धान्यकिट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या किटमध्ये १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ३ किलो तूरडाळ मोफत दिली जाणार आहे.
• ज्वारी बुलडाण्यावरूनच
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात यंदा ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. शासनाने हमीभाव केंद्रांवरून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली ज्वारी साठवणुकीअभावी खराब होऊ नये, म्हणून ती सोलापूर शहरातील रेशन दुकानांतून वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“सोलापूर शहरातील अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबांना मोफत ज्वारी देण्यात येणार असून बुलडाण्यावरून तिचा पुरवठा सुरू झाला आहे,”
असं सोलापूर शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सांगितलं.
• शासनाची मोफत धान्य योजना कायम
दरमहा अंत्योदय कुटुंबांना १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ स्वस्त दरात मिळत होते. मात्र अलीकडच्या काळात ही नियमितता खंडित झाली होती. आता मात्र शासनाने पुन्हा मोफत धान्य वितरण सुरू केले असून, यामध्ये यंदा ज्वारीचाही समावेश झाला आहे.


