
उमेश गायगवळे, मुंबई
बुद्धभूमी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला आता नवे बळ मिळाले आहे.
राज्यातील सर्व बौद्ध संघटना, पक्ष आणि नेते निळ्या ध्वजाखाली एकत्र येत, मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर विराट मोर्चा काढला.
दुपारी तळपत्या उन्हात सुरू झालेला हा मोर्चा सायंकाळीपर्यंत घोषणांनी दणाणून गेला.
सभेच्या अखेरीस येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये ‘अति महाविराट महामोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा होताच मैदानात एकच जल्लोष झाला .
या मोर्चाला सर्वच राजकीय पक्षाचे बौद्ध नेते उपस्थित होते, सर्वांनाच मार्गदर्शन करण्याची वेळ देण्यात आली. मोर्चा आयोजन दुपारी १२ वा. आझाद मैदान येथे असल्याने आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, बौद्ध भिक्खू, अनुयायी, आझाद मैदानात दाखल झाले. मात्र सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मेट्रो सिनेमाकडे जाण्यास सांगितले. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला भर दुपारी या मोर्चात बौद्ध नेत्यांच्या सह बौद्ध भिक्खू संघ, आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते पदाधिकारी अनुयायी महिला या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंबई ठाणे रायगड, विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, संभाजीनगर नांदेड अकोला, आदी जिल्ह्यांतून हजारो अनुयायी या मोर्चात सहभागी झाले होते.
सर उन्हात दुपारी अडीच वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी सात वाजता संपेपर्यंत नेत्यांची भाषणे सुरच होती. अनेक जण उन्हामुळे त्रस्त झाले होते.
परंतु बोधगया महाबोधी विहार हे मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी कार्यकर्ते आझाद मैदानामध्ये भर उन्हात ठाण मांडून बसले होते. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
” केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले असे म्हणाले की, मी जरी सत्तेमध्ये मंत्री असलो तरी समाजाचा लढवय्या असल्याने हे आंदोलन अधिक गतीने कसे पुढे जावे त्यासाठी आम्ही सर्व बौद्ध नेते एकत्र आलो आहोत. आता निर्णायक लढा उभारला जाईल. असंही आठवले म्हणाले”,
” काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते खा. चंद्रकांत हंडोरे असे म्हणाले की, कोणीही ह्या मोर्चाला आले नाही तरी हा मोर्चा थांबणार नाही ही तर सुरुवात आहे, पुढे पुढे या आंदोलनाला प्रचंड गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला”.
” लोक गायक आनंद शिंदे यांच्यासारख्या कवींनी गायकांनी चिंता करण्याची गरज नाही सर्व बौद्ध समाज राजकीय मतभेद विसरून निळ्या आणि पंचशील ध्वजाखाली एकवटला आहे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिला आहे. त्या बुद्धाच्या महाबोधी महाविहार मुक्ती करण्यासाठी आपण पाहिजे ती किंमत मोजायला तयार असला पाहिजे असे ते म्हणाले.”
” यावेळी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे यांनी समाजाच्या ह्या मोर्चा मधून धडा घेऊन समाजाची दिशादर्शन करणे सर्वांचीच नितांत गरज आहे. समाजासाठी नेत्यांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे असे ते म्हणाले”.
“जगभरातील बौद्धांसाठी सर्वाधिक पवित्र असलेल्या महाबोधी महाविहाराचे प्रशासन अद्यापही बौद्ध समाजाच्या पूर्ण नियंत्रणाखाली नाही. गेल्या वर्षभरापासून राज्यात आंदोलन केली जातायेत.मात्र दखल घेतली जात नाही. वेळ आली तर नोव्हेंबर महिन्यातील अधिवेशन आवाज उठवला जाईल असही खा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.”
“लोकगायक आनंद शिंदे यांनी विचार मांडताना असे सांगितले की, स्टेजवरील प्रत्येक नेत्यांनी शंभर लोक आणले असते तरी आझाद मैदान भरून गेले असते, खुर्च्या रिकाम्या पाहून केवळ हा रामदास आठवले यांचेच कार्यकर्ते आहेत बाकींच्या नेत्यांकडे कार्यकर्तेच नाही? त्यामुळे पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले. तर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज पाहायला मिळाली.
“शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी या आंदोलनाला माझा व पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही पाठिंबा असल्याचं सांगितलं.
गेल्या काही महिन्यांपासून बौद्ध भिक्षू आणि अनुयायी या गंभीर अन्यायाविरोधात शांततेने आंदोलन करत आहेत मात्र दखल घेतली जात नाही असा सुरूही उमटला.
यावेळी राज्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते उपस्थित होते,नाना इंदिसे, भाई गिरकर, राजू वाघमारे सिध्दार्थ कासारे. आजी, माजी मंत्री नेते उपस्थित होते.
दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे, नितिन भाऊ मोरे,आदी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष, संघटना, नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपाईचे अध्यक्ष राजेंद्र गवई, अविनाश महातेकर, सुरेश माने, सुलेखाताई कुंभारे, बाळासाहेब पडवळ, अशोक कांबळे, मिलिंद सुर्वे, अनिकेत संसारे, दिलीप काकडे, जयदीप कवाडे, सुरेश केदारे, रवी गरुड, नितीन मोरे, जयदेव गायकवाड आदी नेत्यांची भाषणे झाली.
गेली अनेक वर्षे आपण रस्त्यावरची लढाई लढत आहोत. परंतु दिल्लीमध्ये महाविराट महामोर्चा चे आयोजन केल्यास एक भारत देशाला आणि संपूर्ण जगाला बौद्ध राष्ट्रांची भारत देशातील ताकद दिसून येईल त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यात महाविराट महामोर्चा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एकता आणि स्वाभिमानाचा संदेश आझाद मैदानावर जयभीमच्या घोषणांसह समाजाने दिलेला एकतेचा संदेश स्पष्ट होता.
राजकीय मतभेद विसरून एकाच ध्वजाखाली आलेले नेते आणि अनुयायी यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवा उभारीचा टप्पा दिला आहे.
आता सगळ्यांचे लक्ष दिल्लीतील फेब्रुवारीच्या ‘महाविराट मोर्चाकडे लागले आहे.
जिथे संपूर्ण जगाला भारतीय बौद्ध समाजाची ताकद आणि संघटनशक्ती दिसून येईल.