
कराड प्रतिनिधी
कऱ्हाडच्या कृष्णा विश्व विद्यापीठातील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सर्जनशीलतेची झळाळी दाखवली आहे. देहदान या संवेदनशील विषयावर आधारित त्यांचा लघुपट ‘ऑर्गन डोनेशन’ आणि ‘बॉडी डोनेशन’ या दोन्ही कलाकृतींना ग्रीस येथील इंडिपेंडंट व्हिडिओ फिल्म फेस्टिव्हल ऑफ यूट्यूब आर्ट क्लब पावलोस पराशाकिस या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘ऑस्कर मान्यता’ प्राप्त झाली आहे. या माध्यमातून कृष्णा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवरून थेट जागतिक स्तरावर इतिहास रचला आहे.
ॲनाटॉमी विभागाचे प्रमुख डॉ. एम. पी. अंबाली यांच्या मार्गदर्शनाखाली टायसन न्यूटन फर्नांडिस आणि शुभम पवार यांनी या लघुपटांची निर्मिती केली. “देहदान हे सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश देणाऱ्या या लघुपटातून देहदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून, वैज्ञानिक आणि सामाजिक जाणीव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
फक्त नैसर्गिक मृत्यू झाल्यास देहदान शक्य असते, तसेच एड्स, कावीळ, किंवा नुकतेच ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे शरीर देहदानासाठी स्वीकारले जात नाही. अशी महत्त्वाची माहिती लघुपटातून दिली आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत देहदान प्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे आणि अभ्यासासाठी पार्थिव जतन करण्यासाठी फॉर्मेलिन इंजेक्शनची आवश्यकता याचाही शैक्षणिक उहापोह या चित्रपटात करण्यात आला आहे.
‘ऑर्गन डोनेशन’ हा भावनिक व शैक्षणिक लघुपट असून, अवयवदानातून जीवनदानाचा संदेश देतो. “दुःखातून आशेपर्यंतचा प्रवास” दाखवणाऱ्या या कलाकृतीतून “शरीर नश्वर असले, तरी आपले दान अमरत्व देऊ शकते” असा मार्मिक संदेश दिला आहे.
या लघुपटात शुभम पवार, टायसन फर्नांडिस, पार्थ अंधळे आणि यशराज गंधे यांनी भूमिका साकारल्या आहेत. पटकथा शुभम पवार आणि टायसन फर्नांडिस यांनी लिहिली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी फर्नांडिस यांनी सांभाळली आहे.
या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, विश्वस्त विनायक भोसले आणि विभागप्रमुख डॉ. अंबाली यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
“देहदानाबाबत अनेक गैरसमज समाजात आहेत. ते दूर करून अधिकाधिक लोकांनी देहदान आणि अवयवदान करावे, या हेतूने आमच्या विद्यार्थ्यांनी हा लघुपट तयार केला. ऑस्कर प्लॅटफॉर्मवर त्याला मिळालेलं मानांकन ही अभिमानास्पद बाब आहे.”
डॉ. एम. पी. अंबाली, विभागप्रमुख, ॲनाटॉमी विभाग, कृष्णा विद्यापीठ, कऱ्हाड.
हा लघुपट केवळ सर्जनशीलतेचा नव्हे, तर सामाजिक जाणीवेचा उत्कृष्ट नमुना ठरला असून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाठलेली ही झेप सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.