
मुंबई प्रतिनिधी
घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, वसई (पालघर) आणि परिसरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील तब्बल ५३५४ सदनिकांची संगणकीय लॉटरी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे.
लॉटरीचा कार्यक्रम ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता होणार असून, कोकण मंडळाने सोडतीचे सुयोग्य नियोजन केले आहे. या लॉटरीसाठी एकूण १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,५८,४२४ अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
सोडत स्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल पाहणे सोयीस्कर व्हावे म्हणून सभागृहात आणि बाहेरील आवारात एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. तसेच सोडतीचा कार्यक्रम घरबसल्या पाहता यावा म्हणून ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लिंक:
• YouTube Live
• MHADA Facebook Page
• MHADA YouTube Channel
सोडतीचा निकाल सायंकाळी ६ वाजल्यानंतर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in पाहता येईल. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही निकालाची माहिती देण्यात येणार आहे.
• सदनिकांची घटकवार विभागणी
कोकण मंडळाच्या गृहनिर्माण सोडतीत एकूण ५३५४ सदनिका खालील पाच घटकांमध्ये विभागल्या आहेत –
• २० टक्के सर्वसमावेशक योजना – ५६५ सदनिका
• १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – ३००२ सदनिका
• म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका – १७४६ सदनिका
• म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (५०% परवडणाऱ्या सदनिका) – ४१ सदनिका
कोकण मंडळाची ही सोडत ठाणे-पालघर परिसरातील हजारो घरखरेदीदारांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या या सोडतीकडे लागले आहे.