
मुंबई प्रतिनिधी
महामुंबईतील प्रवाशांना आजपासून वाहतुकीतली मोठी सोय उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक सार्वजनिक वाहतूक अॅपचे उद्घाटन होणार असून, यानंतर लोकल, मेट्रो, मोनोरेल आणि बस प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट काढण्याची आवश्यकता उरणार नाही.
आतापर्यंत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर या उपनगरे तसेच मुंबई शहरात बस, लोकल किंवा मेट्रो प्रवास करताना प्रत्येक टप्प्याला वेगळे तिकीट घ्यावे लागत असे. पण ‘मुंबई वन’ अॅपमुळे आता हे सर्व त्रासदायक टप्पे टळणार आहेत. महामुंबईतील प्रवासासाठी एकाच डिजिटल तिकिटावर प्रवास करता येईल.
या अॅपमध्ये रिअल टाईम प्रवास माहिती, पर्यायी मार्ग, विलंबाची पूर्वसूचना, जवळपासची स्थानके व महत्त्वाच्या ठिकाणांची नकाशासह माहिती यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा सूचना देण्याचीही सोय यात आहे. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देत रांगेत उभे राहण्याची गरजही कमी होईल.
महामुंबईत सध्या बीएमसी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर व नवी मुंबई महापालिकांच्या बससेवा, पश्चिम, मध्य व हार्बर लोकल सेवा, मेट्रो २ अ, ७, घाटकोपर-वर्सोवा मार्गिका, नवी मुंबई मेट्रो, भुयारी मेट्रो ३ तसेच चेंबूर ते सातरस्ता या दरम्यान मोनोरेल या सेवा कार्यरत आहेत. या सर्वांसाठी एकत्रित तिकीट व्यवस्था प्रथमच ‘मुंबई वन’मुळे उपलब्ध होणार आहे.
महानगरातील दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी ही डिजिटल सोय मोठा दिलासा ठरणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे परिमाण मिळणार आहे.