
मुंबई प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उचलण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेला असतानाच, शासन आणि महामंडळ या दोघांकडूनही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत देण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ₹४७१.०५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्सव अग्रीम उचल देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, ज्या कर्मचाऱ्यांना ₹१२,५००/- पर्यंत उत्सव अग्रीम घ्यायची इच्छा आहे, त्यांनी आपले अर्ज १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विभाग नियंत्रकांकडे सादर करावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
वेतन मर्यादा आणि पात्रता
उत्सव अग्रीमसाठी पात्रतेसंदर्भात काही अटी घालण्यात आल्या आहेत.
ज्यांचे मूळ वेतन ₹४३,४७७/- पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीमचा लाभ मिळणार नाही.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पुढील १० महिन्यांच्या आत होणार आहे, त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महामंडळाच्या सूचनांनुसार, प्रत्येक विभागीय कार्यालयाने आपल्या घटकाला लागणाऱ्या एकूण निधीची माहिती १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राज्य परिवहनाच्या लेखा अधिकाऱ्यांना सादर करावी. इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज हे संबंधित शाखा प्रमुखांच्या मार्फतच पाठवायचे असून, स्वतंत्रपणे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा इशारा महामंडळाने दिला आहे.
दिवाळी साजरी होणार आनंदात
दिवाळीचा सण यंदा २१ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा होणार आहे. वेतनासाठी निधी मंजूर होणं आणि उत्सव अग्रीमची सुविधा उपलब्ध होणं, या दोन निर्णयांमुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आलेली ही गोड बातमी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.