
नागपूर प्रतिनिधी
महसूल विभागातील अनियमिततेविरोधात कठोर पवित्रा घेत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (6 ऑक्टोबर) नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर अचानक छापा टाकला. या झाडाझडतीदरम्यान एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्याने एकच खळबळ उडाली.
नागपूरच्या प्रतापनगर येथील या कार्यालयाबाबत रजिस्ट्री प्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या अनेक तक्रारी मंत्रालयात पोहोचल्या होत्या. ऑनलाईन पद्धती सुरू असतानाही एजंटमार्फत पैसे वसूल केले जात असल्याचेही निदर्शनास आले. यावरच थेट कारवाई करत बावनकुळे अचानक कार्यालयात दाखल झाले.
झाडाझडतीदरम्यान सहाय्यक निबंधक अतुल कपले यांच्या टेबलातील ड्रॉवरमधून रोख रक्कम मिळाली. या रकमेचा स्त्रोत काय, याबाबत त्यांनी कपले यांना जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बावनकुळेंनी तातडीने पोलिसांना बोलावले. याप्रकरणी पोलिसांत चौकशीचे आदेशही देण्यात आले.
बावनकुळे म्हणाले, “राज्यातील कुठल्याही रजिस्ट्रारने नागरिकांकडून पैसे मागितले तर त्यांनी थेट माझ्या व्हॉट्सअॅप नंबर 904944040 वर कळवावे. सर्व रजिस्ट्री प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामुळे कोणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”
मंत्र्यांच्या या धडक कारवाईवेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे ‘ड्रॉवरमधील बंडलभर रोख’ उघडकीस आल्यानंतर माध्यमांनी मंत्र्यांना सरळसरळ प्रश्नांचा भडिमार केला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, “अनियमिततेच्या तक्रारी आल्यामुळे मी स्वतःच झाडाझडतीसाठी आलो आहे.”
यापूर्वीही बावनकुळेंनी सावनेर आणि अमरावती येथील निबंधक कार्यालयांवर अशाच प्रकारचे छापे टाकून अनेक गैरप्रकार उघड केले होते. “महाराष्ट्रात कुठेही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
बावनकुळेंच्या या कारवाईनंतर महसूल विभागातील इतर कार्यालयांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.