
नागपूर प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. सरन्यायाधीश धनंजय वाय. गवई यांच्या दिशेने एका व्यक्तीने काहीतरी फेकण्याचा प्रयत्न केला. “सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशी घोषणा देत त्या व्यक्तीने न्यायालयीन कार्यवाहीमध्ये व्यत्यय आणला. विशेष म्हणजे तो वकिलाच्या काळ्या कोटात न्यायालयात शिरला होता. सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले आणि बाहेर नेले.
या घटनेमुळे काही मिनिटे न्यायालयीन कामकाज थांबले; मात्र सत्र पुन्हा सुरू झाल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेला संयम सर्वांच्या लक्षात राहिला. त्यांनी शांतपणे पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि उपस्थितांना उद्देशून म्हणाले, “त्यामुळे विचलित होऊ नका, आम्हीही झालो नाही.”
गवई यांचा हा शांत आणि संतुलित प्रतिसाद न्यायालयीन शिस्तीचे आणि स्थैर्याचे उत्तम उदाहरण ठरला.
सरन्यायाधीश गवई कोण?
अमरावतीत जन्मलेले गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित घरातून आले. त्यांचे वडील रा. एस. गवई हे समाजकारणी आणि माजी राज्यपाल होते. नागपूर येथे वकिली करून न्यायव्यवस्थेत पदार्पण केलेल्या गवई यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आणि अखेरीस १४ मे २०२५ रोजी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवले.
दलित आणि बौद्ध समाजातून या सर्वोच्च पदावर पोहोचलेले ते दुसरे न्यायमूर्ती आहेत. संविधानिक मूल्ये, कायद्याचे राज्य आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचे ते ठाम समर्थक आहेत. ‘बुलडोझर न्याय’ पद्धतीवर त्यांनी उघडपणे टीका केली असून, न्यायव्यवस्था ही कायद्याच्या राजावर चालते, हे त्यांनी वारंवार अधोरेखित केले आहे.
या घटनेनंतर न्यायालयीन सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असले, तरी सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेले संतुलन आणि स्थैर्यच खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू ठरले.