
मुंबई प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील खासगी लॅबच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि कठोर शिक्षा होईल, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात पॅथॉलॉजी, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन अशा विविध चाचण्या घेणाऱ्या लॅब आहेत, परंतु अनेकदा चुकीचे रिपोर्ट येणे, तसेच वेगवेगळ्या लॅबमध्ये एकाच रुग्णाचे विरोधाभासी रिपोर्ट येणे ही तक्रार नोंदवली गेली आहे. दरवाढीवरही नियंत्रण नसल्याचे आढळले आहे.
तसेच बोगस औषधे शोधण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाच्या माध्यमातून ड्रग डिटेक्शन मशीन खरेदी केली आहे. ‘फ्लायिंग स्कॉड’ पथक या मशीनच्या सहाय्याने विविध ठिकाणी औषधांची गुणवत्ता तपासेल. बोगस औषधे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
याशिवाय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एमआयव्ही) स्थापन केली जाणार असून त्यासाठी 36 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.