
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात अनपेक्षित घडामोडींची मालिकाच सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध आघाड्यांवर नेतेमंडळी हालचाली करत आहेत. त्यात रविवारी एक महत्वाची घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीने राज्याच्या राजकारणात चर्चेचे नवे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे, या भेटीत महापालिका निवडणुकीसंदर्भातील प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकीय चर्चेला दुजोरा दिला आहे.
“बात बहोत दूर तक जायेगी…” अशा शब्दांत राऊत यांनी या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले.
दरम्यान, या भेटीनंतर सत्ताधाऱ्यांच्या गोटातही खळबळ उडाली आहे. भाजप-शिंदे गटाशी दोन हात करण्यासाठी ठाकरेबंधू पुन्हा जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.