
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा जाहीर केला आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) यात ३ टक्क्यांची वाढ करण्यास बुधवारी (१ ऑक्टोबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या निर्णयामुळे दसर्याआधीच लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार असून दिवाळीपूर्वीच आनंदाची लाट उसळली आहे. वाढीव भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू होणार असून ऑक्टोबरच्या पगारात कर्मचाऱ्यांना थकबाकीही मिळणार आहे. त्यामुळे आता डीएचा दर ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका होणार आहे.
या वाढीचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. वर्षातून दोनदा – जानेवारी आणि जुलै महिन्यात – महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. जुलैपासून या वाढीची प्रतीक्षा लागून राहिलेल्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळीपूर्वीच ही भेट मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आठवा वेतन आयोग लवकर लागू करण्याची मागणी युनियनने केली असून जानेवारी २०२६ पासून तो लागू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाने आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे. या गीताने स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली असून, नवीन पिढीला देशभक्तीच्या भावनेने प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.