
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील एका दाम्पत्याचा अवघ्या ४५ दिवसांत मोडलेला संसार आणि त्यासाठी दिली गेलेली तब्बल ४५ लाखांची पोटगी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. हा कोणत्याही सेलिब्रिटी किंवा उद्योगपतीचा नव्हे, तर सर्वसामान्य दाम्पत्याचा घटस्फोट आहे. मात्र, अल्पावधीत झालेल्या या महागड्या तडजोडीमुळे प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात ‘प्रीती’ आणि ‘प्रणय’ (नावे बदललेली) यांचा विवाह झाला. लग्नानंतर प्रीती सासरी गेली, मात्र ‘हुंडा आणि मानपान केले नाही’ या कारणावरून सासरी तिला त्रास दिला गेला, असा तिचा आरोप होता. एवढेच नव्हे तर, ‘तू मला पसंत नाहीस, घरच्यांच्या आग्रहाखातर लग्न केले’ असे पतीकडून वारंवार सांगितले जात असल्याचे प्रीतीने पोलिसात नमूद केले. वाद वाढत जाऊन अवघ्या ४५ दिवसांतच प्रीतीला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणात प्रीतीने पतीसह सासू, सासरा आणि नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, वर्षभरापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईदरम्यान पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनामुळे तोडगा निघाला.
पत्नीची बाजू मांडणाऱ्या अॅड. प्रियांका काटकर आणि अॅड. रेश्मा सोनार यांच्या समुपदेशनातून दोन्ही पक्षांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला. त्यानुसार पतीने एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर प्रीतीनेही सकारात्मक प्रतिसाद देत कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप मागे घेतले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार आरोपींची मुक्तता झाली आणि परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्यात आला.
समुपदेशनाची प्रक्रिया अशा वादांमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचविण्यासाठी समुपदेशकांच्या मार्गदर्शनातून दोन्ही पक्षांना समाधानकारक तोडगा मिळू शकतो, असे पत्नीच्या वकील अॅड. रेश्मा सोनार यांनी सांगितले.
पुण्यातील या महागड्या घटस्फोटामुळे पुन्हा एकदा समुपदेशन आणि न्यायालयीन तोडग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.