
जळगाव प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. भाजपने ठाकरे गटाला एक मोठा धक्का दिला असून, ठाकरेंच्या गटातील तब्बल १५ शिलेदारांनी साथ सोडली आहे. हे सर्वजण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पक्षप्रवेशाचा मुहूर्त घटस्थापनेच्या दिवशी निश्चित करण्यात आला होता. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता या सर्वांचा प्रवेश नवरात्रीच्या कालखंडात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रवेश करणाऱ्या सात जणांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली असून, त्यात तीन माजी महापौरांचा समावेश आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भाजपने पक्षप्रवेशाची मोहीम सुरू केली आहे. जिल्हाभरातील इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव शहरात ठाकरे गटातील मातब्बरांना भाजपत प्रवेश देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यामुळं पक्षाची ताकद दिवसेंदिवस अधिक भक्कम होत चालली आहे. ठाकरे गटाला लागोपाठ मिळणारे हे धक्के आगामी निवडणुकांसाठी निश्चितच महत्त्वाचे मानले जात आहेत.