
मुंबई प्रतिनिधी
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या अभियानास विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी शैक्षणिक साहित्य सुपूर्द करून बळ दिले.
मागील दहा वर्षांपासून या अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक उत्सव, महापुरुषांच्या जयंती, मान्यवरांचे वाढदिवस आदी प्रसंगी वह्या,पेन गोळा करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. नुकताच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने “हारफुले, बुके, केक वा भेटवस्तू न देता शैक्षणिक साहित्य द्या” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी शुभेच्छुकांना केले होते. या सामाजिक बांधिलकीला उदंड प्रतिसाद मिळत जवळपास हजाराहून अधिक वह्या, पेन व अन्य साहित्य जमा झाले.
हे साहित्य डॉ. गोऱ्हे यांनी ‘एक वही, एक पेन’ अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार राजू झनके, शंकर कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडे औपचारिकरित्या सुपूर्द केले. या उपक्रमामुळे त्यांच्या सामाजिक दायित्वाची प्रशंसा सर्वत्र होत असून “सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या सामाजिक व राजकीय धुरिणांनी असा आदर्श उपक्रम राबविल्यास वंचित घटकांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळेल” असा आशावाद व्यक्त करण्यात आला.