
अमरावती प्रतिनिधी
राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं नदी-नाल्यांना पूर आला आणि शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सरकारकडून पंचनामे वेळेत होत नाहीत, मदतीचा ठोस निर्णय होत नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला असून शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालं आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा बु. गावचे शेतकरी द्यायाराम राठोड यांनी वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी आपल्या नुकसानीचा निषेध नोंदवण्यासाठी थेट निमंत्रण पत्रिका छापली आहे.
त्यात असं म्हटलं आहे
शेतमाऊलीच्या कृपेने, आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, यावर्षी आमच्या शेतात सोयाबीन लागवड केली होती. परंतु अतिवृष्टी व पुरामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. तरी वारंवार कळवूनही कोणी पाहणीस आले नाही. म्हणूनच पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत आमच्या शेतात ट्रॅक्टर व रोटाव्हेटर फिरवण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे.”
ही निमंत्रण पत्रिका आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, यंदाच्या पावसाने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पीक हानी केली आहे. विशेषत, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटले गेले आहेत. आता त्यांची नजर शासनाकडून होणाऱ्या तातडीच्या मदतीवर लागली आहे.