
मुंबई: प्रतिनिधी
मुंबईत पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. मालाड पूर्व, दिंडोशी येथे घडलेल्या घटनेत पती नितीन जामधे याने पैशाच्या वादातून व संशयावरून पत्नी कोमलला मित्राच्या घरी बोलावून तिच्यावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन जामदे ( वय 32) आणि कोमल जामदे (वय 24) या दोघांनी 6 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, कौटुंबिक नाराजीमुळे दोघेही लग्नानंतरही एकत्र राहत नव्हते. लग्नाच्या रात्री त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. त्यामुळे दोघेही वेगळे राहू लागले. नितीन बँकेत काम करत होतो. आणि कोमल खासगी नोकरी करायची. लग्नानंतर कोमल बाहेरगावी जायची. दुसऱ्या एका तरुणासोबत ती फिरू लागली. त्यांचा एक खासगी फोटो पती नितीनने व्हायरल केला होता. त्याबाबत पत्नीने २०२३ मध्ये दिंडोशी येथे पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, पती नितीन जेव्हा जेव्हा आपल्या पत्नीला आपल्यासोबत राहायला बोलवायचा. तेव्हा ती त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी करत असे. त्यामुळे तो नाराज होत असे. रविवारी (दि. २९) संध्याकाळी पती नितीनने पत्नी कोमलला त्याच्या मित्राच्या घरी भेटायला बोलावले असता तिने आधी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे नितीनने पत्नीला त्याच्या मित्राच्या घरी बोलावून तिच्यावर चाकूने 8 वार केले. त्यामुळे तिच्या मानेवर, पाठीवर, कंबरेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. खून केल्यानंतर पती नितीन पत्नीला बाथरूममध्ये बंद करून पळून गेला. त्यानंतर कोमलच्या आईला ही बाब समजली. कोमलच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.