
नवी मुंबई प्रतिनिधी
पावसाळ्यात सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली की, प्रवाशांसाठी ऑटो रिक्षा हा जणू जीवनदायी पर्याय ठरतो. पण या सोयीचेच आता लूट साधन झाले आहे. नवी मुंबईतील अनेक रिक्षाचालकांनी “मीटरबंद” टोळ्या तयार करून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करण्याचा धंदाच सुरू केला आहे.
“मीटरमध्ये पाणी गेलंय” किंवा “मीटर बंद आहे” अशी कारणे पुढे करून प्रवाशांना लुटले जात आहे. भाडे दुप्पट-तिपटीने आकारले जात असून, नागरिक या उर्मटपणाला कंटाळले आहेत. “जायचं नसेल तर दुसरी रिक्षा बघा” अशा दमदाटीने प्रवाशांना अक्षरशः गप्प केले जाते.
नेरुळ,सीवूड्ससाठी 200, उलवेसाठी 300, उरणसाठी तब्बल 450 रुपये
नेरुळ एलपी परिसर हा या मनमानीचा गड ठरला आहे. पहाटे गावाकडून परतणाऱ्या प्रवाशांकडे ट्रेन-बसची सोय नसल्याने रिक्षाचालक त्यांच्या असहाय्यतेचा सर्रास फायदा घेतात. नेरुळ ते सीवूड्स 200 रुपये, उलवे 300 रुपये, तर उरणपर्यंत तब्बल 450 रुपयांपर्यंत भाडे मागितले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
सीबीडी, सानपाडा, वाशी हायवे, रबाळे नाका आणि कोपरखैरणे परिसरातही हीच परिस्थिती असून “मीटरबंद” टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप केला जातो.
सुरक्षेच्या नियमांनाही तिलांजली
फक्त भाड्याची लूटच नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेलाही तडा जात आहे. नियमाप्रमाणे रिक्षात चालकाव्यतिरिक्त तीन प्रवासीच बसू शकतात. मात्र बेलापूर-उलवे मार्गावर एकाच रिक्षात ४-५ प्रवासी कोंबले जातात. पावसाळ्यात खड्डेमय रस्ते आणि निसरडी परिस्थिती लक्षात घेता अपघातांची शक्यता अधिकच वाढत आहे.
कारवाई केवळ आकडेवारीपुरती?
रिक्षाचालकांच्या मनमानीवर आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मे २०२५ मध्ये विशेष मोहीम राबवली. यात २,१४२ रिक्षाचालकांवर कारवाई करून १.०३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी २०२४ मध्ये १,८८१ चालकांवर कारवाई करून तब्बल ३४.४७ लाखांचा दंड बसवण्यात आला होता. तरीही रस्त्यावरील वास्तवात फारसा फरक पडलेला नाही. नागरिकांचे म्हणणे आहे, “कारवाई फक्त कागदावर दिसते, पण जमिनीवर रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच आहे.
तक्रारींसाठी हेल्पलाईन उपलब्ध
या संदर्भात नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “नेरुळ एलपी परिसरात अंमलदार तैनात आहेत. गस्ती पथकही कार्यरत आहे. जर प्रवाशांना असा त्रास होत असेल, तर त्यांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्वरित मदत केली जाईल. तसेच वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवरही नागरिक तक्रार करू शकतात.