
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एक खास योजना जाहीर केली आहे. फक्त ५८५ रुपयांत संपूर्ण महाराष्ट्रभर अमर्याद प्रवास करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, या पासच्या मदतीने प्रवाशांना सलग चार दिवस महाराष्ट्रभर मोफत आणि अमर्याद प्रवास करता येणार आहे. हा पास कोणत्याही साध्या आणि निम आराम बसेससाठी लागू असेल.
महिलांना आणि ज्येष्ठांना सवलती
एसटीने महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत दिली आहे. मात्र, या सवलतीसाठी आता महामंडळाने एक विशेष ओळखपत्र अनिवार्य केले आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल, असा दावा केला जात असला तरी या निर्णयाबाबत काही प्रवाशांत नाराजीही दिसून येते.
सणासुदीच्या प्रवाशांसाठी सोयीची योजना
नव्या पास योजनेचा सर्व प्रवाशांना लाभ होणार आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा पिकनिकसाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी हा पास फायद्याचा ठरणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्य भाग सहजतेने पाहता येणार आहेत.
पास कसा मिळेल?
हा चार दिवसीय विशेष पास जवळच्या एसटी आगारात मिळणार असून, रोख रक्कम किंवा युपीद्वारे पेमेंट करून तो सहज काढता येईल.
या योजनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सोयीस्कर प्रवास करता येणार असून, राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.