
मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रमांना सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा काल देशभर शुभारंभ झाला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
महिला घर सांभाळताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. रोगांचे लवकर निदान व तपासणी सातत्याने होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे अभियान केवळ पंधरा दिवसापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे,” असे शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिंदे यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध योजनांची अंमलबजावणी होत असल्याची माहिती दिली.
रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ३९४ ‘नमो गार्डन’ उभारणी, ७५ गावांत पाणीपुरवठा योजना, शेतकऱ्यांना शेतीसाठी अवजारांचे वाटप, तसेच ‘नमो कौशल्य केंद्र’ आणि ‘मनो वैश्विक संपर्क समन्वय अभियान’ अशा उपक्रमांना प्रारंभ झाला आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी ज्या भावनेने समाजकार्यात स्वतःला झोकून दिले, त्याच भावनेतून हे अभियान लोकांची सेवा करण्यासाठी राबविण्यात येत आहे,” असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.