
मुंबई प्रतिनिधी
देशाचे यशस्वी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त खार पूर्वेतील साईबाबा रोड, जवाहर नगर येथे जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन हा वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला.
१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता स्वीट कॉर्नर येथे उत्सवाची सुरुवात झाली. सुरुवातीला मोदी साहेबांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. लहानपणापासूनचा संघर्ष, संघटनातील योगदान, गुजरातचे मुख्यमंत्रीपद आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून केलेली सेवा या सर्व टप्प्यांचा आढावा घेणारा हा चित्रपट उपस्थितांना भावला. या चित्रपटाच्या माध्यमातून मोदींच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास नव्या पिढीसमोर उभा राहिला.
यानंतर वातावरण जल्लोषात भरून गेले. फटाक्यांची आतषबाजी सुरू होताच परिसर दुमदुमून गेला. रंगीबेरंगी फटाक्यांच्या रोषणाईने आकाश उजळून निघाले आणि उपस्थितांनी एकमुखाने “मोदी साहेबांचा विजय असो” अशा जयघोषात सहभाग घेतला. फटाक्यांच्या प्रकाशात नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याचा अद्भुत माहोल निर्माण झाला.
त्यानंतर भलामोठा केक कापून मोदी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केक वाटून गोडीगुलाबी वातावरण निर्माण केले. विशेष म्हणजे या सोहळ्यादरम्यान स्थानिक वाॅर्ड उपाध्यक्ष दिलीप पुजारी यांचा ही वाढदिवस असल्याने त्यांचाही केक कापण्यात आला आणि द्विगुणित जल्लोष साजरा झाला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नागरिकांचा मोठ्या संख्येने झालेला सहभाग. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले. मिठाईचे वाटप करण्यात आले आणि सर्वत्र उत्सवाचा आनंद पसरला.
कार्यक्रमाला भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. जिल्हा अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, मुंबई उपाध्यक्ष सुहास आडिवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश दाभोळकर, जिल्हा सचिव रुपेश मालुसरे, जिल्हा सदस्य रश्मी मालुसरे, लोकेश दवे, तसेच वाॅर्ड अध्यक्ष नवनाथ दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण खार पूर्व भागात मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. मिठाई, फटाके, आनंद, जयघोष आणि मोदींच्या कार्याचे स्मरण या सगळ्यांनी ७५ वा वाढदिवस अविस्मरणीय ठरला. नरेंद्र मोदींचे नेतृत्व भारतीय जनतेसाठी प्रेरणादायी असून या जल्लोषाने त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती पुन्हा एकदा आली.