
मध्यप्रदेश वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मध्यप्रदेशातील धार येथे महिलांकरिता व मुलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा शुभारंभ करताना त्यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत देशभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय जाहीर केला.
#WATCH | Dhar, Madhya Pradesh | Addressing a public rally, PM Modi says, "… Today, I have come here to demand something from my mothers and sisters… All I ask is that all of you should attend these camps (Swasth Nari Sashakt Parivar)without any hesitation… All the tests in… pic.twitter.com/venL1L4zRD
— ANI (@ANI) September 17, 2025
या सोबतच ‘सुमन सखी चॅटबॉट’ व आठव्या राष्ट्रीय पोषण महिना मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. मोदींनी सांगितले,आई निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते. महिलांच्या आरोग्याशिवाय घराची व्यवस्था टिकत नाही. त्यामुळे ही मोहीम आमच्या माता-भगिनींना समर्पित आहे.
अणुबॉम्बच्या धमकीला भारत घाबरत नाही
सभेत भाषण करताना मोदींनी राष्ट्रसुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. हा नवा भारत आहे. आपल्या जवानांनी पाकिस्तानला डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गुडघ्यावर आणले. आम्ही कोणाच्याही अणुबॉम्बच्या धमकीला घाबरत नाही. गरज पडली तर घरात घुसून मारतो,” असे ते म्हणाले.
17 सप्टेंबर एक ऐतिहासिक दिवस
मोदी म्हणाले की, 17 सप्टेंबर हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी भारतीय सैन्याने हैदराबादला मुक्त केले होते. अनेक दशके ही घटना दुर्लक्षित राहिली, मात्र केंद्र सरकारने आता हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
मित्र पार्क’चे उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते धार येथे 2,150 एकर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या मित्र पार्क’चेही उद्घाटन झाले. या औद्योगिक संकुलात आधुनिक रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प व कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आदी सुविधा उपलब्ध असतील. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल व उत्पन्नात वाढ होईल, असे मोदींनी स्पष्ट केले.
महिलांना थेट आवाहन
सभेत उपस्थित महिलांना उद्देशून मोदी म्हणाले, “आज मी माझ्या माता,भगिनींकडे मागायला आलो आहे. या शिबिरांमध्ये कोणताही संकोच न बाळगता सहभागी व्हा. सर्व चाचण्या व औषधे मोफत असतील. राज्याचा खजिना तुमच्या आरोग्यापेक्षा मोठा नाही. या मोहिमा 2 ऑक्टोबर, विजयादशमीपर्यंत सुरू राहतील.
‘विकसित भारत’ यात्रेचे चार स्तंभ
मोदींनी स्पष्ट केले की, विकसित भारत यात्रेचे चार आधारस्तंभ आहेत, महिला, तरुण, गरीब व शेतकरी. “आज या चारही स्तंभांशी संबंधित योजना राष्ट्राला समर्पित करतो,असे सांगून त्यांनी माता-भगिनींना ही योजना अर्पण केली.