
पाटणा
‘चहावाला’ म्हणवणारा एक तरुण एवढा श्रीमंत कसा झाला, हा प्रश्न गोपालगंजच्या लोकांना कायम पडायचा. रोज सकाळी चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा हा युवक अचानक लक्झरी कारमधून फिरू लागला, हातात महागडे घड्याळ, गळ्यात सोन्याची साखळी… आणि मग पोलिसांच्या एका धाडीनं सगळा भांडाफोड केला!
गोपालगंज पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत या ‘गरीब चहावाल्या’च्या घरातून तब्बल १ कोटी ५ लाख ४९ हजार ८५० रुपये रोकड, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी, तसेच ८५ एटीएम कार्ड, ७५ बँक पासबुक, २८ चेकबुक, २ लॅपटॉप, ३ मोबाईल आणि एक लक्झरी कार असा प्रचंड ऐवज जप्त करण्यात आला.
या धक्कादायक कारवाईत अभिषेक कुमार आणि आदित्य कुमार या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक हा पूर्वी चहाचं दुकान चालवायचा, पण नंतर दुबईला जाऊन ‘सायबर चोरी’च्या जगात पाऊल टाकलं. दुबईहूनच तो संपूर्ण नेटवर्क हाताळत होता, तर त्याचा भाऊ आदित्य गावात बसून ‘ऑपरेशन’ला मदत करत होता.
सायबर डीएसपी अवंतिका दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपालगंजमधील एका आलिशान घरावर छापा टाकला. तिथं नोटांच्या बंड्या, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली तिजोरी आणि सायबर फसवणुकीचं सामान पाहून अधिकारी सुद्धा थक्क झाले.
कसं चालायचं हे ‘सायबर साम्राज्य’?
या भावंडांनी विविध बँक खात्यांचा वापर करून ऑनलाईन फसवणूक केली. चोरीचे पैसे वेगवेगळ्या खात्यांत फिरवून नंतर रोकड स्वरूपात व्यवहार केले जात. अनेक खात्यांमधील एटीएम कार्ड आणि पासबुक बंगळुरूमधील असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या मते, या नेटवर्कचे धागे बिहारच्या बाहेर, देशाच्या इतर राज्यांत आणि परदेशातसुद्धा पसरलेले असण्याची शक्यता आहे.
आता आयकर विभाग आणि एटीएसही मैदानात
मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने सापडल्यानं आता प्राप्तिकर विभाग आणि एटीएसची पथकंदेखील गोपालगंजमध्ये दाखल झाली आहेत. आरोपींच्या उत्पन्नाचे स्रोत आणि परदेशी व्यवहारांबाबतही चौकशी सुरू आहे.
गावभर चर्चेचा विषय
‘चहाच्या टपरीवर चहा विकणारा एवढ्या पैशांचा मालक कसा झाला?’ हा प्रश्न आता गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांच्या मते, ही टोळी केवळ दोन नव्हे तर अनेक जणांच्या सहभागानं चालवली जात होती. पुढच्या काही दिवसांत अजून मोठे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकरणांत ही कारवाई ‘वॉर्निंग बेल’ ठरत असून, दुबईहून चालवण्यात आलेलं हे सायबर साम्राज्य उध्वस्त करणं पोलिसांसाठी मोठं यश ठरलं आहे.