
कल्याण प्रतिनिधी
कल्याण पूर्वचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना 2014 मधील गाजलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाली आहे. जवळपास 11 वर्षे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित होता. अखेर न्यायालयाने गायकवाड यांच्यासह पाचही आरोपींची निर्दोष सुटका केली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कल्याण परिसरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे शिष्टमंडळ थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी गायकवाड हेही एका केबल व्यावसायिकाच्या प्रकरणी ठाण्यात आले. याच ठिकाणी गायकवाड आणि शिंदे यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्येच झालेल्या या राड्यानंतर पोलीसांनी गायकवाड, शिंदे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, गायकवाड यांचे पुतणे कुणाल पाटील आणि समर्थक विक्की गणात्रा यांनी ठाण्यातच गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व घटनेची 11 वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर न्यायालयाने सर्व आरोपी निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाची माहिती बचाव पक्षाचे वकील गणेश घोलप यांनी दिली.
राजकीय पटलावर मात्र यानंतर समीकरणे पालटली. 2014 मध्ये गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी असलेले निलेश शिंदे पुढे शिवसेना शिंदे गटात गेले आणि त्यांनीच गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.
सध्या मात्र गणपत गायकवाड आणि त्यांचे पुतणे कुणाल पाटील हे हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी तळोजा कारागृहात आहेत.