मुंबई प्रतिनिधी
राजभवनात सोमवारी सकाळी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली. विशेष म्हणजे देवव्रत यांनी राज्यपालपदाची शपथ संस्कृत भाषेत घेतली.
आचार्य देवव्रत यांच्याकडे गुजरातसोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी ते ऑगस्ट २०१५ ते जुलै २०१९ दरम्यान हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. जुलै २०१९ पासून ते गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. शपथ घेतल्यानंतर राजभवनात त्यांना मानवंदनाही देण्यात आली.
इतिहास आणि हिंदी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या देवव्रत यांनी योग विज्ञानात डिप्लोमा केला असून, निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानात डॉक्टरेटही प्राप्त केली आहे. वैदिक तत्त्वज्ञान, मानवी मूल्ये आणि नैसर्गिक शेती यावर त्यांनी व्यापक प्रमाणात काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणि प्रशासन पारदर्शक करण्यासाठी त्यांनी हिमाचल व गुजरातमध्ये महत्त्वपूर्ण प्रयत्न केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांच्या कार्यशैलीबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, शपथविधीसाठी देवव्रत रविवारी रेल्वेने मुंबईत दाखल झाले. पत्नी दर्शना देवी यांच्यासह ते मुंबई सेंट्रल स्थानकात आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वे पोलीस विभागाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देवव्रत यांचे हे पहिलेच पर्व असून, आगामी काळात ते कशाप्रकारे प्रशासनाशी समन्वय साधतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


