
पुणे प्रतिनिधी
नवी मुंबईतील एका ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर अडचणीत सापडल्या आहेत. पुणे शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २२१, २३८ आणि २६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
नवी मुंबईत ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातानंतर कारमधील दोन व्यक्तींनी ट्रक चालकाच्या मदतनीस प्रल्हाद कुमार याचे अपहरण करून त्याला पुण्यातील मनोरमा खेडकर यांच्या घरी आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या तपासात अपहरण केलेल्या व्यक्तीला नेण्यात आलेले ठिकाण हेच खेडकर यांचे घर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, मनोरमा खेडकर यांनी त्यांना अडवले आणि दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास मदत केली. इतकेच नव्हे, तर पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा आरोपही त्यांच्या विरुद्ध करण्यात आला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याच्या या प्रकारानंतर चतुश्रृंगी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या घडामोडींमुळे आधीच वादात सापडलेल्या खेडकर कुटुंबावर आणखी एक संकट ओढवले आहे.