
नागपूर प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला असून यामध्ये १,५१६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यंदाच्या निकालात लागलेला विक्रमी कट ऑफ पाहून विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत खुल्या गटाचा कट ऑफ ५०७.५०, अनुसूचित जाती गटाचा ४४७ तर अनुसूचित जमाती गटाचा ४१५ इतका लागला आहे. आजवरचा हा सर्वाधिक कट ऑफ मानला जात आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेले ७,९७० उमेदवारांपैकी ७,७३२ जणांनी अर्ज सादर केला होता. काही उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याची तक्रार केली होती; मात्र अर्ज प्रणाली व्यवस्थित कार्यरत असल्याचे स्पष्ट करत आयोगाने मुदतवाढ नाकारली होती.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कट ऑफविषयी चर्चा सुरू झाली आहे. “मागील काही वर्षांत कट ऑफ ४५० पर्यंत होता; परंतु यंदा तो ५०० च्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षा अधिक आव्हानात्मक बनत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची दिशा आणि गती त्यानुसार ठरवणे आवश्यक आहे,” असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले.