
मुंबई प्रतिनिधी
अनंत चतुर्थीनिमित्त शनिवारी (ता. ६) राज्यभरात गणेश विसर्जनाची धूम सुरू झाली. ढोल-ताशांचा निनाद, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी शहरासह ग्रामीण भागही दुमदुमून गेला. प्रमुख गणेश मंडळांसह घरगुती बाप्पालाही भक्तीभावाने निरोप देण्यात आला.
मुंबईत अनेक ठिकाणी सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून पोलिस व पालिकेच्या व्यापक बंदोबस्तामुळे वातावरण सुरळीत राहिले. भाविकांची मोठी गर्दी असून, अनेकांनी कृत्रिम तलावांत बाप्पाचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व कुटुंबीयांसह त्यांच्या अधिकृत निवासस्थान वर्षा येथे गणपतीचे विसर्जन केले. कृत्रिम तलावात पार पडलेल्या या विधींना भक्तिमय वातावरण लाभले. “गणरायाने गेल्या दहा दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रावर कृपा केली आहे. राज्यात उत्साहात मिरवणुका सुरू आहेत. आशा आहे की सर्व काही शांततेत पार पडेल व कायदा-सुव्यवस्था राखली जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, “अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महान म्हटले, ही आनंदाची बाब आहे. पण त्यांनी तसे म्हटले नसते तरी मोदी हे नक्कीच महानच राहतील. अनेक जागतिक नेते त्यांच्याविषयी असेच मत व्यक्त करतात. आजचा भारत स्वबळावर परराष्ट्र धोरण आखतो. सहकार्याचे स्वागत करतो, मात्र आपल्या विकासाच्या मार्गावर स्वतंत्रपणे वाटचाल करतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.