
पुणे प्रतिनिधी
हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न. मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचे हे स्वप्न धुसर होत चालले आहे. अशा वेळी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ (म्हाडा) पुणेकरांसाठी दिलासा घेऊन येत आहे. पुण्यातील प्राईम लोकेशनवर तब्बल १३ हजार ३०१ घरांसाठी म्हाडाकडून बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील रोहकल येथे सुमारे ८ हजार घरे, तर मुळशी तालुक्यातील नेरे येथे ५,३०१ घरे उभारली जाणार आहेत. या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एकूण ५७ एकर गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाकडे सुपूर्द केली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाणार असून, त्यातील काही घरे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
रोहकलमधील गट क्रमांक २२० मधील १५ हेक्टर ७६ गुंठे आणि जिल्हा परिषदेच्या एनओसीनंतर मिळालेली १५ हेक्टर ४६ गुंठे जमीन म्हाडाकडे देण्यात आली आहे. या जमिनीवर सुमारे आठ हजार घरांचा प्रकल्प उभारला जाईल. तर नेरे (गट क्रमांक ११७, ११८) येथे साडेसात हेक्टरहून अधिक जागेवर पाच हजार ३०१ घरांचा प्रकल्प होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांतून घरे टप्प्याटप्प्याने तीन ते चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, जमीन सुपूर्द झाल्यानंतर तीन वर्षांत वापर झाला नाही, तर ती जमीन परत घेण्याची अट जिल्हा प्रशासनाने घातली आहे.
पुणे विभागीय सभापती शिवाजीराव आढळराव म्हणाले, “रोहकल आणि नेरे येथील प्रकल्पांतून साधारण १३ हजार घरे उभारली जातील. त्यापैकी काही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब घटकांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत.”
मुंबईनंतर पुण्यातही म्हाडाच्या घरांची बंपर सोडत लागणार असल्याने पुणेकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.