
बीड प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज एकत्र येत आहे. मात्र, या लढ्याची किंमत आणखी एका जीवाने चुकवली आहे. बीड जिल्ह्यातील आहेरवडगाव येथील भरत खरसाडे (वय २८) या तरुणाने मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ न शकल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली.
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’च्या हाकेला हजेरी लावण्याची भरतची प्रबळ इच्छा होती. पण घरातील हालाखीची परिस्थिती आणि प्रवासखर्चासाठी वडिलांनी पैसे न दिल्यामुळे तो हतबल झाला. “सरकार जाणूनबुजून आरक्षणावर चालढकल करत आहे. मला या आंदोलनात सहभागी व्हायलाच हवं. मी घरी कसा बसू?” असं म्हणत त्याने विषारी औषध प्राशन केले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
भरतवर बीडमधील खासगी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आंदोलनासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या या तरुणाच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. “आमचा मुलगा गेला, आमचा पोटचा गोळा गेला… सरकारने आता तरी तातडीने निर्णय घ्यावा. अजून किती बळी द्यावे लागणार?” असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला.
भरत हा प्रत्येक आंदोलनात, मोर्चात अग्रेसर सहभागी व्हायचा. त्याचे असे अनेक फोटो समोर आले असून त्याच्या मृत्यूने नातेवाईक शोकाकुल झाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव गावातील नितीन चव्हाण (वय ३७) या युवकानेही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सलग दोन युवकांच्या आत्महत्यांमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, राज्य सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.