
पुणे प्रतिनिधी
सिंहगड रस्ता परिसरातील दीर्घकाळाची वाहतूककोंडीची समस्या अखेर सुटणार आहे. पुण्यातील सर्वात मोठा दुहेरी उड्डाणपूल प्रकल्प आज (१ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकांसाठी खुला करण्यात आला. दुपारी तीन वाजता झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावर सुमारे २.५ किमी लांबीचा हा दुहेरी पूल उभारण्यात आला आहे. ११८ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झाले होते. नियोजनानुसार फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असतानाच सहा महिने आधीच तो वापरासाठी खुला करण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता हा पुण्यातील सर्वाधिक गर्दीचा मार्ग मानला जातो. वाढत्या लोकसंख्येसह वाहनांच्या प्रचंड ताणामुळे या मार्गावरची कोंडी नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. या नव्या उड्डाणपूलामुळे फनटाईम ते विठ्ठलवाडी प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे.
या प्रकल्पामुळे सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन पुणेकरांचा अमूल्य वेळ वाचणार असून, वाढत्या वाहतुकीसाठी हा पूल शहराला दिलासा देणारा नवा मैलाचा दगड ठरणार आहे.