
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील २२ वर्षीय तरुणी भक्ती जितेंद्र मयेकर हिचा खून करून तिचा मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवरून झालेली ओळख प्रेमसंबंधात रुपांतरित झाली; मात्र परस्परांतील वाद आणि तणाव अखेर या खुनाला कारणीभूत ठरला.
या प्रकरणी संशयित प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. खंडाळा), बार मॅनेजर विश्वास पवार (३५) आणि मोटार चालक सुशांत नरळकर यांना अटक करण्यात आली आहे.
१६ ऑगस्टला दहीहंडीच्या दिवशी भक्ती प्रियकराला भेटण्यासाठी खंडाळा येथे गेली होती. भेटीदरम्यान झालेल्या वादातून संतापाच्या भरात दर्शन पाटीलने तिचा गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने दोघांची मदत घेतली व आंबा घाटातील खोल दरीत मृतदेह फेकला.
दरम्यान, भक्ती १६ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर २१ ऑगस्टला तिच्या बेपत्तेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तपासादरम्यान तिचे सोशल मीडियावरील संपर्क पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, नीलेश माईनकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व तब्बल १५० पोलिस कर्मचारी आंबाघाटात दाखल झाले. संशयिताने दाखवून दिलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम राबवून भक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते; मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे मृतदेहाची ओळख निश्चित झाली.
या घटनेने मिरजोळे व खंडाळा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.