
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासऱ्याच्या काम सांगण्यावरून संतापलेल्या एका सुनबाईने थेट जेवणात विष कालवून सासरा आणि नवऱ्याचा खात्मा करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे कोसुंब रेवाळेवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयित सुनबाई स्वप्नाली सचिन सोलकर (वय 32) हिने आपल्या सासऱ्याच्या सतत काम सांगण्याच्या सवयीला कंटाळून थेट त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. या कृत्यात तिचा पती सचिन सोलकर (वय 34) देखील बळी पडला असून, सासरा व पती दोघेही सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
‘हा प्लॅन होता भयानक… पण वेळेवर उघड झाला’
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जुलैच्या रात्री घडली. घरात सासऱ्याने स्वच्छता, केर काढणे, इतर कामं करण्याबाबत वारंवार सूचना दिल्याने संतापलेल्या स्वप्नाली हिने रात्रीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळून सासऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जेवणात तिचा पती सचिन यानेही सहभाग घेतला आणि दोघांनाही काही वेळातच अस्वस्थ वाटू लागलं. तात्काळ उपचारासाठी त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात, आणि नंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
फिर्याद पतीकडूनच!
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार स्वप्नालीचा पती सचिन सोलकर यानेच देवरुख पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून स्वप्नाली सोलकर हिच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, शुक्रवारी पोलिसांनी तिला अटक केली. तिची चौकशी सध्या सुरू आहे.
पोलीस यंत्रणा अलर्ट; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा घटनास्थळी दौरा
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तपासाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सविस्तर पंचनामा केला आहे.
कडक चौकशी, पुढील कारवाईची शक्यता
स्वप्नालीच्या मोबाईल, हालचाली आणि विषारी पदार्थ कसा आणि कुठून मिळवला याचा शोध सुरू आहे. वैद्यकीय अहवालानुसार विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा अधिक गंभीर मानला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मुख्य मुद्दे :
* सासऱ्याच्या सततच्या सूचना ऐकून सुनबाईचा विषप्रयोग
*पतीही विषबाधेचा बळी, दोघेही रुग्णालयात
* पतीचीच तक्रार, सुनबाई अटकेत
* पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता