
पुणे प्रतिनिधी
शिक्रापूर परिसरात शनिवारी संध्याकाळी झालेल्या पोलिस कारवाईत साताऱ्याचा कुख्यात गुन्हेगार लखन भोसले ठार झाला. अनेक घरफोड्या आणि गंभीर गुन्ह्यांत वॉन्टेड असलेला भोसले, पोलिसांच्या सापळ्यात अडकला असता प्रतिकार करताना ठार पडल्याची माहिती समोर आली आहे.
संध्याकाळी सहा वाजता झालेल्या या चकमकीत भोसलेचा एक साथीदार मात्र पसार झाला. त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
घरफोड्यांचा सत्र आणि पोलिसांचा सापळा
गेल्या काही दिवसांत शिक्रापूर परिसरात घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच भोसलेने चाकूचा धाक दाखवून एका महिलेचे दागिने लंपास केले होते. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याच्या हालचालींचा गुप्त माहितीच्या आधारे मागोवा घेत सातारा पोलिसांच्या विशेष पथकाने शिक्रापूरमध्ये सापळा रचला.
अटक करण्याचा प्रयत्न होत असतानाच भोसलेने शस्त्रासह पोलिसांवर हल्ला केला. या चकमकीत चार पोलीस जखमी झाले. आत्मसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात भोसले जागीच ठार झाला.
साताऱ्यापासून पुण्यापर्यंत दहशत
खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी असलेल्या लखन भोसलेवर सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण यांसारखे डझनभर गुन्हे दाखल होते. गेल्या काही महिन्यांपासून तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता.
त्याचा मृत्यू झाल्यानंतर शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. फरार साथीदारालाही लवकरच गजाआड करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.