
बीड प्रतिनिधी
बीड |मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झगडणाऱ्या बीड जिल्ह्यातील आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. सतीश ज्ञानोबा देशमुख (वय ४४, रा. वरपगाव, ता. केज) यांचे आज सकाळी नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशमुख हे मराठा आरक्षणासाठी नेहमीच सक्रिय राहिले होते.
बीड जिल्हा हा आरक्षण आंदोलनात सर्वाधिक बळी देणारा जिल्हा ठरला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६४ समाजबांधवांनी या लढ्यात प्राण दिल्याची नोंद सरकारी आकडेवारीत आहे.
देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक होते. दोन वर्षांपासून प्रत्येक आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. काल (२७ ऑगस्ट) ते गावातील सहकाऱ्यांसह मुंबईतील आंदोलनासाठी रवाना झाले होते. जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहनही होते. मात्र, आज सकाळी प्रवासादरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सतीश देशमुख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांचे वडील ज्ञानोबा आणि भाऊ व्यंकटेश हे दोघेही सैन्यदलातून निवृत्त असल्याने त्यांच्या घरात लढाऊ बाणा आहे.
या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “ही घटना अत्यंत दुःखद आहे. आमच्या देशमुख बांधवाचा मृत्यू झाला. याला फडणवीस साहेब जबाबदार आहेत. तुम्ही आता आरक्षण दिले असते तर आमचे जीव गेले नसते. लातूरमध्ये दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली आणि आज पुन्हा एक बळी गेला,” असे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यातील बलिदानांची ही मालिका थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.