
पुणे प्रतिनिधी
पुणे हे गणेशोत्सवाचे प्रमुख केंद्र. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि त्यानंतर पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आजही हे गणपती परंपरा, भक्ती, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडवत आहेत.
१) मानाचा पहिला कसबा गणपती
शहराचे ग्रामदैवत असलेले श्री कसबा गणपती १६३६ मध्ये जिजामातांनी प्रस्थापित केले. शनिवारवाड्याजवळील हे मंदिर सार्वजनिक कार्यात अग्रगण्य आहे. विद्यार्थ्यांचे दत्तक शिक्षण, दुष्काळग्रस्त गावांचा विकास अशी अनेक सामाजिक कामे मंडळ करते.
२) मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
शहराच्या ग्रामदेवतेजवळील या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झाली. शाडूच्या मूर्तीची परंपरा, चांदीच्या पालखीतून विसर्जन मिरवणूक हे या गणपतीचे वैशिष्ट्य. एकेकाळी मेळ्यांमुळे या उत्सवाला विशेष रंगत यायची.
३) मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
१८८७ पासून सुरु असलेल्या या मंडळाला “पुण्याचा राजा” म्हणून ख्याती आहे. लक्ष्मी रस्त्यावरील हा उत्सव फुलांच्या रथातून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध.
४) मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना झाली. भव्य १३ फूट उंच मूर्ती आणि देखाव्यांची कलात्मक परंपरा यामुळे हा गणपती वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.
५) मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
लोकमान्य टिळकांच्या केसरी संस्थेच्या वाड्यात १८९४ मध्ये या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. आजही हा उत्सव पालखीतून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमुळे विशेष आकर्षणाचा विषय ठरतो.
६) दगडूशेठ हलवाई गणपती
१८९३ पासून अस्तित्वात असलेला हा गणपती श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक. मंदिराचे २००३ मध्ये विस्तारीकरण झाले असून भक्तांसाठी ते पुण्याचे प्रमुख आकर्षण मानले जाते.
७) भाऊसाहेब रंगारी गणपती
१८९२ मध्ये कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती आजही तितक्याच जोशात उत्सवात दिसते. राक्षसावर प्रहार करणारी ही मूर्ती ऐतिहासिक आणि अनोखी आहे.
८) अखिल मंडई गणपती
लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन झालेला हा गणपती “झोपाळ्यावरचा गणपती” म्हणून ओळखला जातो. सांस्कृतिक वारसा आणि मंडई परिसराची एकजूट यातून या मंडळाने वेगळे स्थान मिळवले आहे.